काही दिवसांपूर्वीच झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र, त्यांनी अर्ज न भरता मुलगा सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज भरला आणि काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर काल बाळासाहेब थोरात यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, निडवणुकीवेळी हे झालेलं राजकारण हे बाळासाहेब थोरांतांच्या सहमतीनेच झालं, असा दावा भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. सुजय विखे हे सध्या दिल्लीमध्ये असून त्यांनी आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “…म्हणून नोटेवर महात्मा गांधी नसावेत”, तुषार गांधींनी व्यक्त केलं मत
काय म्हणाले सुजय विखे पाटील?
ज्यादरम्यान विधानपरिषदेचं राजकारण झालं. त्याच दरम्यान संगमनेरमध्ये काही ठेकेदारांचा मोर्चा निघाला होता. या मोर्चाला बाळासाहेब थोरातांनी मोबाईलवर संबोधित केलं होतं. तेव्हाही ते आजारी होते. मग असं काय झालं की विधानपरिषदेच्या राजकारणावर ते बोलू शकले नाहीत? जर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला असेल तर मग ठेकेदरांना त्यांनी कसं संबोधित केलं? त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी जे राजकारण झालं ते बाळासाहेब थोरातांच्या सहमतीने झालं, हे नाकारात येणार नाही, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली.
हेही वाचा – “घरातच तिकिट मिळालं असतं तर…” मुक्ता टिळक यांचे पती शैलेष टिळक यांनी व्यक्त केली खंत
दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना, बाळासाहेब थोरात हे निष्ठावान आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. याबाबत विचारलं असता, काँग्रेसमधील राजकारणाबाबत बाळासाहेब थोरात यांनी आपली यापूर्वीच मांडायला हवी होती. त्यामुळे त्यांची पक्षावर किती निष्ठा आहे, याबाबत बोलण्यात अर्थ नाही. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जिथेही त्यांचे नातेवाईक काँग्रेस विरोधात उभे होते, तिथे त्यांनी पक्षाला बाजुला सारून नातेवाईकांनाच मदत केली आहे, असे ते म्हणाले.