धाराशिव : राज्यातील बहुतांश भागातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्या आणि निवडणूक संपल्यामुळे बुधवारी श्री तुळजाभवानी देवीचा दरबार भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संपूर्ण मंदिर परिसर, महाद्वार रोड, भवानी रोड गर्दीने अक्षरशः गजबजून गेला होता.

मंगळवारी मध्यरात्री एकनंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर उघडण्यात आले. चरणतीर्थ, धार्मिक विधी झाल्यानंतर भाविकांना देवीदर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. भल्या पहाटे जगदंबेच्या दर्शनासाठी तुळजापूर नगरीत दाखल झालेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पहाटेच्या सुमारास श्री कल्लोळ तीर्थामध्ये स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कल्लोळ तिर्थप्रामाणेच मंदिरातील गोमुख तीर्थावरही भाविकांची तुडुंब गर्दी होती. धर्मदर्शन, मुखदर्शन घेण्यासाठी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी दिवसभर जगदंबेचे मंदिर आणि परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून आला होता.

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; उपोषणाची तारीख सांगत म्हणाले…

हेही वाचा – “पैशांच्या बॅगा अशा उघडपणे…”, मुख्यमंत्र्यांच्या त्या व्हिडीओवरून संजय शिरसाट काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. तसेच अभिषेकासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी होती. तुळजाभवानी मंदिर गर्दीच्या दिवशी रात्री एक वाजता उघडेले जाते. मंदिर प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे भाविकांची मोठी गर्दी होऊनही सर्वांना सुरळीत व वेळेत दर्शन घेता आले. मंदिर परिसरातील हजारोच्या संख्येने उपस्थित भाविक आई राजा उदे-उदे असा जयघोष करीत मोठ्या श्रद्धेने तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक झाले. या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. उन्हाळी सुट्ट्या आणि बहुतांश भागातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने भाविक मंगळवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले होते. भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने रात्री १ वाजण्याच्या सुमारास मंदिर उघडले. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळली.