अकोले: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) ज्येष्ठ नेत्या सुनीता भांगरे, त्यांचे दीर तथा माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे आपल्या काही कार्यकर्त्यांसमवेत आज, मंगळवारी भाजपमध्ये दाखल झाले. त्यांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी मात्र अपेक्षेप्रमाणे पक्ष सोडला नाही. तसेच राष्ट्रवादीच्या बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अमित भांगरे यांच्याप्रमाणेच या पक्षप्रवेश सोहळ्याकडे पाठ फिरविली.
सुनीता भांगरे यांनी अमित भांगरे यांच्यासह मागील आठवड्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली होती. माजी आमदार वैभव पिचड हेही त्यावेळी उपस्थित होते. त्याच वेळेला सुनीता भांगरे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. आज मुंबई येथे भाजपचे प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. माजी आमदार पिचड, भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे हेही उपस्थित होते. सुनीता भांगरे, दिलीप भांगरे यांचे समवेत मुख्यतः भंडारदरा परिसरातील काही आजी-माजी सरपंचांसह सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय प्रवाहात सामील झाल्याबद्दल चव्हाण यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. ज्या विश्वासाने या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, त्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्री विखे यांनी अकोले तालुका शत-प्रतिशत भाजपमय करण्याची ग्वाही दिली तर वैभव पिचड यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अकोले मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचे आश्वासन दिले.
सुनीता भांगरे या तालुक्यातील दिवंगत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या पत्नी होत. सध्या त्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष आहेत. दोनवेळा त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सुनीता भांगरे या पदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जातात. भांगरे घराण्याचे विखे परिवाशी अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यामुळे आरक्षण जाहीर झाले तेव्हाच सुनीता भांगरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
पिचड-भांगरे दीर्घ संघर्षाची पार्श्वभूमी
पिचड-भांगरे राजकीय संघर्ष अकोले तालुका अनेक वर्षे पहात आला आहे. विधानसभेला राष्ट्रवादीचे अमित भांगरे, अपक्ष असणारे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि डॉ. किरण लहामटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. तसेच दिवंगत अशोक भांगरे यांनीही सहावेळा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. या पार्श्वभूमीवर पिचड व भांगरे अनेक वर्षांनंतर एकत्र येत आहेत. कार्यकर्ते, जनता त्याचे कसे स्वागत करते, हे पाहण्यासाठी निवडणुकीपर्यंत थांबावे लागेल.
