बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुनाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेलया पंकज कुमावत यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. या प्रकरणाच्या तपासाबाबत कुटुंबियांनाही माहिती उपलब्ध करुन द्यावी असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. या खुनाच्या घटनेला दोन वर्ष उलटून गेले तरी या प्रकरणात आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. त्यामुळे मुंडे यांच्या कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज बीड दौऱ्यावर होत्या.त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची बीड येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी मुंडे कुटुंबीयांकडून महादेव मुंडे खून प्रकरणाच्या चौकशी बाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या खून प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी पंकज कुमावत यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या प्रकरणात विशेष पथक स्थापन करून तीन महिने उलटून गेले तरी अद्याप आरोपी निष्पन्न झाले नसल्याचे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणाची मिळालेली माहिती पोलिसांनी कुटुंबीयांना द्यावी अशी विनंती त्यांनी विशेष तपास पथकाच्या प्रमुखास केली.
‘सुप्रिया सुळे यांची भेट घेतली .सुरवातीपासून त्या माझ्या पाठिशी उभ्या आहेत. या प्रकरणात माझा जबाब नोंदवला गेला असला तरी पोलीस फक्त तपास सुरू असल्याचे सांगतात. परंतु तीन महिने उलटूनही या प्रकरणात आरोपी निष्पन्न नाहीत. माझा स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही. कुमावत यांच्यावर विश्वास आहे. पण ते आम्हाला काहीच माहिती देत नाहीत. केवळ तपास सुरू आहेत असे सांगतात. आज सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आता मी पंकज कुमावत यांची भेट घेणार आहे.- ज्ञानेश्वरी मुंडे, बीड
