बुधवारी सकाळपासूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे खळबळ उडाली. अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचा दावा केला. तसेच, १५ आमदार बाद होणार असल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मंत्रालयातल्या एका व्यक्तीच्या माहितीवर त्यांनी हा दावा केला असला, तरी त्यामुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदाव्यांना उधाण आलं आहे. यासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह खुद्द अजित पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नेमका काय आहे अंजली दमानियांचा दावा?

अंजली दमानियांनी आज सकाळी ट्वीट करून राज्याच्या राजकारणात तुफान चर्चेला तोंड फोडलं आहे. “आज मंत्रालयात एका कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गंमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू. आणखीन किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, असं ट्वीट अंजली दमानियांनी केलं आहे.

अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर

दरम्यान, अजित पवारांनी अंजली दमानियांच्या दाव्यावर अवघ्या एका वाक्यात उत्तर दिलं आहे. “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार?” असं अजित पवार माध्यमांना म्हणाले.

दरम्यान, अंजली दमानियांनी केलेल्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्या म्हणाल्या, “ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचं ट्वीट मी काही वाचलेलं नाही. पण त्यांनी काही लिहिलं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे”.

“शरद पवारांच्या विधानावर १० दिवस चर्चा होते, मग लोक म्हणतात, अरेच्च्या…”, सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया!

अजित पवार खरंच भाजपाबरोबर जाणार?

अंदली दमानियांनी केलेल्या दाव्यानुसार अजित पवार खरंच भाजपाबरोबर जाणार आहेत का? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी पावसाच्या उदाहरणासह सूचक विधान केलं आहे. “१५ मिनिटांनी इथे मुळशीत पाऊस पडेल का? याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. पण १५ मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही”, असं त्या म्हणाल्या.