भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवारांबरोबर शपथविधी घेतला होता, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सहा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आहे. अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. असं असूनही कंड्या पिकवायला (गॉसिप करायला) त्यांना वेळ कसा मिळतो? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना शाळेतील नॉटी (खोडकर) मुलांशी केली आहे. फडणवीसांना टोला लगावत सुळे म्हणाल्या, “शाळेत काही विद्यार्थी असतात. ज्यांचं लक्ष सातत्याने खिडकीच्या बाहेर असतं. पण अभ्यासात सहाही विषयात ते नापास होतात. अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची झाली आहे. मला वाटतं, त्यांची खिडकीतील जागा बदलून त्यांना वर्गात मध्यभागी बसवायला हवं. कारण शाळेत काही नॉटी मुलं असतात, त्यांचं खिडकीतून बाहेर लक्ष जाऊ नये म्हणून शिक्षक त्यांची जागा बदलतात. फडणवीसांनाही असंच मध्यभागी बसवायला हवं, त्यामुळे त्यांना कामावर लक्ष केंद्रीत करता येईल. कारण उपमुख्यमंत्रीपद असणं आणि सहा-सहा खाती सांभाळणं, हे खूप जबाबदारीचं काम आहे.”

हेही वाचा- सत्यजीत तांबे भाजपात प्रवेश करणार? ‘त्या’ ट्वीटवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

फडणवीसांना शरद पवारांचा सहारा- सुळे

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे. कारण बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते पवारांचं नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवत आहेत, अशी शक्यता आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on devendra fadnvis claim about early morning oath allegations on sharad pawar naughty rmm
First published on: 15-02-2023 at 14:46 IST