राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? हा वाद आता थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवार गटाने पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदही आमच्याकडे असल्याची भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही गटातील नेते पक्षावर, पक्षचिन्हावर आणि पक्षाच्या अध्यक्षपदावर दावे करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या पक्षाच्या स्थापनेपासून (१९९९) शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत. अजित पवारांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे त्यांना हवं ते बोलू शकतात, याचा अर्थ असा नाही की ते बोलतायत तेच सत्य आहे. सुप्रिया सुळे दी इंडियन एक्सप्रेसशी बोलत होत्या.
सुनील तटकरे म्हणाले की अजित पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे जे निवेदन दिलंय त्यात आम्ही तेच म्हटलं आहे. आम्हाला खात्री आहे की निवडणूक आयोग आमच्या बाजूने निर्णय घेईल.
हे ही वाचा >> “…तरी यांची घागर उताणीच राहणार”, दहिहंडीच्या आयोजनावरून ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल
अजित पवार यांनी केलेल्या दाव्यांबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, खरंतर कुठलीही व्यक्ती पक्षाचा मालक नसते. जनता ही खरी मालक आहे. १९९९ साली जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हापासूनच शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटील हे गेल्या काही वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
गेल्या आठवड्यात कोल्हापुरात पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते की मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत.