Supriya Sule Appeals Devendra Fadnavis : गेल्या महिन्याभरात झालेल्या हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्याचबरोबर परभणीत झालेला हिंसाचार व न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील कायदा आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोन्ही प्रकरणांची एसआयटी चौकशी पारदर्शकपणे करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजले होते. तर सोमनाथ सूर्यवंशी याच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूची देश पातळीवर दखल घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी परभणी येथे येत सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रात घडलेल्या दोन्ही घटना मनाला प्रचंड वेदना देणाऱ्या आहेत. माझा अजूनही विश्वास बसत नाही, इतक्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. अशा गोष्टी आपण कादंबऱ्यांमध्ये वाचायचो, चित्रपटांमध्ये पाहायचो हे आपल्या महाराष्ट्रात होत आहेत हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहे.”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, राजकारण होत राहिल पण महाराष्ट्राची संस्कृती आणि माणुसकी आपण सगळ्यांनी मिळून जपली पाहिजे. आज येवढे मोठे बहुमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाले आहे, त्यामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. अर्थातच मी त्यांची विरोधक आहे, पण बीड आणि परभणीत जी घटना घडली आहे त्याची एसआयटी चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे.”

हे ही वाचा : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी परभणीत

परभणीत १० डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर परभणीत हिंसाचार झाला होता. हिंसाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. यानंतर, आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणी गांधींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनी केली आहे”, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.