राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचं पत्रही निवडणूक आयोगाला दिलं आहे. अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशा आशयाचं पत्रही निवडणूक आयोगाकडे सादर केलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या बंडखोरीवर सूचक भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार उद्धृत केले आहेत.याचं शीर्षक ‘आलं तर आलं तुफान’ असं आहे. या कवितेतून सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीत एकप्रकारे लढण्याचा इरादा पक्का केल्याचा संदेश दिला आहे.

हेही वाचा- शरद पवारांना आणखी एक धक्का? अत्यंत विश्वासू माजी मंत्री अजित पवार गटाच्या वाटेवर

ट्वीटद्वारे शेअर केले विचार

“आलं तर आलं तुफान”

तुफानाला घाबरुन काय करायचं
तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे
तुफानापासून पळून जाणाऱ्या
माणसाच्या हातून काही घडत नाही.
तुफानाला तोंड देण्याची
जी शक्ती आणि इच्छा आहे
त्यातनं तो काहीतरी करू शकतो
आणि घडवू शकतो
अशी माझी धारणा आहे
यशवंतराव चव्हाण (७ मे १९८४, अहमदनगर)

हेही वाचा- मोठी अपडेट: नऊ आमदार वगळता सर्व आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा? जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी ५ जुलै रोजी पार पडलेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्यातही एक कविता सादर केली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे भाषणात म्हणाल्या होत्या, “१५ वर्षांपूर्वी दासू वैद्य यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती. तेव्हा मी स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते. त्यांनी लिहिलं होतं की, ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’.