Suraj Chavan apology over Latur Assault case : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचं दिसत आहे. हा विधीमंडळाच्या सभागृहातील व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून कोकाटेंवर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, रविवारी (२० जुलै) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन दिलं. तसेच त्यांना पत्त्यांचा डावही दिला. त्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण केली.

या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व मारहाण करणारे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर टीका होत आहे. ही टीका पाहून चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली. सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे की “आम्ही छावा संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसज दूर करू. छावा संघटनेच्या प्रतिनिधींनी निवेदन देताना काही असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे माझ्याकडून व आमच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली.”

आधी बेदम मारहाण आता सूरज चव्हाणांकडून दिलगिरी

सूरज चव्हाण म्हणाले, “शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या छावा संघटनेच्या प्रतिनिधींना व प्रदेशाध्यक्ष विजय पाटील यांना आम्ही मारहाण केल्याचा दावा प्रसारमाध्यामांवर केला जात आहे. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी प्रश्नावर कोणी आवाज उठवत असेल तर त्याच्या पाठिशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. मात्र, तिथे आमच्या नेतृत्त्वाबद्दल असंवैधानिक शब्द वापरले गेले होते. त्यामुळे आमच्याकडून तशी कृती (मारहाण) झाली. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय पाटील यांची भेट घेणार आहे. या भेटीवेळी मी त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छावा’कडून लातूर बंदची हाक

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर छावा संघटनेने आज (२१ जुलै) लातूर बंदची हाक दिली आहे. शहरात अनेक ठिकाणी या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संघटनेने उद्या जिल्हा बंदची हाक दिली आहे. सूरज चव्हाणवर कारवाई होईपर्यंत आंदोलन चालू ठेवू अस संघटनेने म्हटलं आहे.