परभणी : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली भारतीय जनता पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड आता जाहीर झाली असून या पदावर सुरेश भुमरे यांची वर्णी लागली आहे. या पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या नावांची चर्चा होती. तथापि या चर्चेमध्ये भुमरे यांनी बाजी मारली.

काही दिवसांपूर्वीच परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची निवड पक्षाने जाहीर केली. त्याचवेळी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचीही निवड जाहीर होईल असे अपेक्षित होते. मात्र ही निवड या ना त्या कारणाने लांबणीवर पडत गेली. या पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. मावळते जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांचीच परत वर्णी लागेल असेही वातावरण निर्माण झाले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा झाला. या दौऱ्याआधी जिल्हाध्यक्षाची घोषणा होईल असे अपेक्षित होते.

भुमरे हे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याशी ते एकनिष्ठ आहेत. या पार्श्वभूमीवर भुमरे यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. तथापि या नावाला पक्षातल्याच काहींनी विरोध केला होता. पक्षातल्या नेते मंडळींना भेटून आमच्यापैकी कोणालाही करा पण भुमरे यांना नको असेही काही इच्छुकांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष पदाबाबत एकमत होत नव्हते. अखेर भुमरे यांची नियुक्ती झाल्याने या सर्व चर्चेवर पडदा पडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय जनता पक्षाने शहर व ग्रामीण अशा दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करताना सामाजिक समतोल राखला आहे. शहर जिल्हाध्यक्षपद मराठा समाजाला दिल्यानंतर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पक्षाने ओबीसी चेहरा दिला आहे.