Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. ९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडमध्ये होणारी गुन्हेगारी, वाल्मिक कराडचं कनेक्शन, खंडणीचे प्रकार या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलं. आज त्यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटींची खोटी बिलं लावून पैसे कसे उचलले गेले त्याचा सगळा हिशेबच मांडला. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला कृष्णा आंधळे कोण याबाबतही सुरेश धस यांनी माहिती दिली.

सुरेश धस यांनी काय आरोप केला?

२०२१ मध्ये पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीत ७३ कोटी ३६ लाखांची बोगस बिलं उचलली आहेत. माझ्याकडे तीन फाईल्स आहेत त्यात काय काय घडलं त्याचे तपशील आहेत. तुम्ही पत्रकारांनी तुमच्या तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मी तुम्हाला देतो त्या याद्या पोस्ट करा असं आवाहन सुरेश धस यांनी केलं. याबाबत आता धनंजय मुंडे काही उत्तर देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान कृष्णा आंधळेबाबत सुरेश धस यांनी महत्त्वाची माहिती दिली.

कृष्णा आंधळे बाबत काय म्हणाले सुरेश धस?

“कृष्णा आंधळे याच्याबद्दल मी पोलिसांकडून माहिती घेतली. एसआयटी चांगलं काम करते आहे. आमच्या जिल्ह्यातील पोलीसही चांगलं काम करत आहेत. काही पोरांची नावं पेपरमध्ये आली आहेत. माझी वरिष्ठांना किंवा माहिती देणाऱ्या विनंती आहे की चुकीची माहिती देऊ नये. भागवत, शेलार यांच्यासारख्या एलसीबीच्या ज्या पोरांनी जी कोणी लोक आहेत यांनी ६ पैकी ५ आरोपी यांनीच पकडले आहेत आणि आता त्यांचीच नाव टीव्हीवर ‘आका’शी संबंध असल्याचे दाखवलं जात आहेत.” असं सुरेश धस म्हणाले. कृष्णा आंधळे कोण आहे? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृष्णा आंधळे पोलीस भरतीची तयारी करत होता पण..

“कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले आहेत. त्याच्या घरी गरीबी आहे. पत्र्याचं घर आहे. त्याला फारसं काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्कविना राहतो अशी त्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वगैरे अशा ठिकाणी गेला आहे का? याचा तपास सुरु आहे. तो सध्या फरार आहे. कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे, हा आरोपी आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी तो फरार आहे. ५० दिवस झाले आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे. पण आम्ही तपासावर समाधानी आहोत.” अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.