Suresh Dhas Vs Prajakta Mali : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यामुळे सगळा महाराष्ट्र हादरला. दरम्यान सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत वक्तव्य केलं. ज्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसंच महिला आयोगाकडेही तक्रार केली. एवढंच नाही तर रविवारी प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिलं. मी माफी मागत नसतो म्हणणारे सुरेश धस यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच त्यांच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढला गेला असंही ते म्हणाले आहेत.

काय आहे हे प्रकरण?

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना लक्ष्य करतानाच प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली आहेत. अवैधरीत्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला.

सुरेश धस काय म्हणाले होते?

“विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते”, असं विधान त्यांनी केलं होतं. तसेच, “जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे”, असंही ते म्हणाले होते.

हे पण वाचा- Prajakta Mali vs Suresh Dhas: प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाचे मोठे पाऊल; मुंबई पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

प्राजक्ता माळीने काय मागणी केली होती?

“फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना फार सॉफ्ट टार्गेट केलं जातं. कुणीही यावं आणि नावं घेऊन जावं. तुम्ही तुमच्यातल्या राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांच्या नावांचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला. प्रसारमाध्यमांसमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं जाहीरपणे माझी मागावी. फक्त माझीच नाही, ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय, त्यांचीही त्यांनी माफी करावी. कोणत्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये. ” या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा सुरेश धस यांना आज दुपारी विचारणा करण्यात आली तेव्हा सुरेश धस यांनी माझ्यासाठी तो विषय संपला असं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
What Suresh Dhas Said About Prajakta Mali?
प्राजक्ता माळीबाबत प्रश्न विचारताच काय म्हणाले सुरेश धस? (फोटो-फेसबुक पेज)

सुरेश धस काही वेळापूर्वी नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ताताई माळींबाबत मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत काही बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेलतर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.