शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. “कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्रही पाकिस्तानात नाही,” असं म्हणत त्यांनी भाजपा दोन राज्यांमध्ये झुंजी लावण्याचं काम करत आहे, असा गंभीर आरोप केला. त्या मंगळवारी (६ डिसेंबर) उस्मानाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “कन्नड वेदिका संघटनेने जे केलं ते अत्यंत अपमानास्पद आहे आणि ही घटना लाजीरवाणी आहे. महाराष्ट्र सरकारने सरकार म्हणून महाराष्ट्रासाठी काय करत आहात हा प्रश्न निर्माण होत आहे. कर्नाटक पाकिस्तानात नाही आणि महाराष्ट्रही पाकिस्तानात नाही. भारत या संघराज्य देशातील ही दोन राज्य आहेत. मात्र, भाजपा या दोन राज्यांच्या झुंजी लावण्याचं काम करत आहे.ते अत्यंत वाईट आहे.”

“केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने ठरवलं तर काही होईल का?”

“आज टोलनाक्यावर गाड्या अडवल्या गेल्या, गाड्या फोडायचा प्रयत्न झाला, त्यांच्या नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न झाला. हे ठरवून केलं गेलं. कर्नाटकमध्ये आणि केंद्रातही भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे भाजपाने असं काही होऊ नये ठरवलं तर काही होईल का? तर तसं काहीच होणार नाही,” असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

“भाजपा ठरवून महाराष्ट्राला अस्थिर करत आहे”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “याचा अर्थ भाजपा ठरवून महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक स्थिती अस्थिर करत आहे. जितकी राजकीय अस्थिरता होईल तितके गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाहीत आणि ते उद्योगधंदे राज्याच्या बाहेर जातील. राज्य अस्थिर झालं की लोकांचं लक्ष मुख्य मुद्द्यांवरून हटवणं सोपं जाईल. शेतकरी, महिला, बेरोजगारांनी प्रश्न विचारू नये. जेव्हा कोणताच प्रश्न सुटत नाही तेव्हा भाजपाकडून असे मुद्दे उकरून काढले जातात.”

हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गावं तिकडे पाठवली जात आहेत”

“गुजरातच्या निवडणूक काळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले. आता कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गावं कर्नाटकमध्ये पाठवली जात आहेत.हे घातक आहे,” असंही सुषमा अंधारे यांनी नमूद केलं.