आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे दोन्ही शब्द चर्चेत आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मै झुकेगा नही घुसेगा असं म्हणत उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या डायलॉगबाजीवर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे.
काय म्हटलं आहे सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये?
“झुकेगा नहीं घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काही पटत नाही राव” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारेंची ही पोस्ट व्हायरल होते आहे. तसंच हे ट्वीटही त्यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही.”
देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं उत्तर?
“मला म्हणाले फडतूस गृहमंत्री, उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हूँ मै.. झुकेगा नहीं साला घुसेगा.” “सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात त्यांच्याबाबत मला काहीही वाटत नाही. वीर सावरकर यांचा अपमान करणारे सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक वीर सावरकरांचा अपमान करतील तोपर्यंत सावरकरप्रेमी रस्त्यावर उतरून या कुचक्या लोकांचा निषेध करत राहतील”
अनिक्षा जयसिंघानीचं प्रकरण काय आहे?
अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघांनीच्या विरोधात FIR केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनिक्षाशी पहिली भेट २०२१ मध्ये झाली होती. अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की अनिक्षाने त्यांना हे सांगितलं होतं की ती डिझायनर आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना हे सांगितलं की पब्लिक इव्हेंटमध्ये तुम्ही मी डिझाइन केलेले ड्रेसेस आणि ज्वेलरी परिधान करा. त्यामुळे मला माझ्या ब्रांडचं प्रमोशन करता येईल. अमृता फडणवीस यांनी ही बाब मान्य केली. मात्र अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात IPC च्या कलम १२० बी नुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता फडणवीस यांनी हा एफआयआर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला दाखल केली होती.