पुण्यातील भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) पदाधिकारी राजीव सातव यांना कानशिलात लगावल्याचा धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडला आहे. यानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण केली नसल्याचं सांगत सारवासारव केली. आता, शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील कांबळे यांच्यासह भाजपावर टीका केली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील ससून रूग्णालयात विविध वॉर्डचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. यावेळी महिला प्रदेशाध्य७ रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रवींद्र धंगेकर, भाजपा सुनील कांबळे उपस्थित होते. यावेळी मंचावरून खाली उरत असताना कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली. त्यापूर्वी सुनील कांबळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट ) वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांना देखील कानाखाली मारल्याची घटना घडली होती.
“अजित पवारांच्या उपस्थितीत सुनील कांबळेंची दादागिरी”
यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “सुनील कांबळे वादग्रस्त वक्तव्य आणि दादागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. दोन वर्षापूर्वी पुणे महापालिकेतील महिला अभियंत्याला अत्यंत अभद्र भाषेत सुनील कांबळेंनी शिवीगाळ केली होती. तर, बिल्डरच्या फायद्यासाठी आनंदनगर येथील रहिवाश्यांना सुनील कांबळेंनी दमदाटी केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कांबळेंनी दादागिरी केली आहे. पहिल्याच प्रकरणात कांबळेंना समज देत कारवाई झाली असती किंवा निलंबन झाले असते, तर पुन्हा असे करण्याची हिंमत झाली नसती.”
“भाजपाच्या आमदारांनी धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांना अभद्र भाषा वापरावी”
“भाजपा अशा आमदारांचं कधीही निलंबन करत नाही. उलट भाजपाच्या आमदारांनी मारहाण करावी, हातपाय तोडावे, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांना अभद्र भाषा वापरावी. पण, याबाबत गृहखाते कुठलीही हालचाल करणार नाही,” असं म्हणत सुनील कांबळे प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
“मी त्या व्यक्तीला बाजूला सारलं अन्…”
सुनील कांबळेंनी पोलीस कर्माचाऱ्याच्या मारहाणीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “मी कार्यक्रम झाल्यावर मंचावरून खाली येत होता. त्यावेळी पायऱ्या उतरताना एक व्यक्ती अचानक समोर आल्यानं मी पडलो असतो. त्यामुळे मी त्या व्यक्तीला बाजूला सारलं आणि खाली उतरलो. मी त्याच्या कानशिलात लगावली नाही,” असं सुनील कांबळेंनी सांगितलं.