कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मागील १०० दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुरुंगात होते. त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलासा देत संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊतांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दुसरीकडे ईडीने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“वाघ माघारी आला आहे. कर नाहीतर डर कशाला ही हिंमत संजय राऊतांनी दाखवली. राऊतांनी मरण पत्करेन, पण शरण पत्करणार नाही, हा स्वाभिमान दाखवला. तो आमच्यासाठी आदर्शवत आहे. तसेच, ४० जण गेले आहेत, त्यांच्यासाठी हे ढळढळीत उदाहरण आहे, की तुम्ही चुकीचं काही केलं नसते तर, घाबरवण्याची गरज नव्हती. तुम्ही घाबरलात याचा अर्थ तुम्ही काय आहात ठरवून घ्या,” असा टोला शिंदे गटातील आमदारांना सुषमा अंधारेंनी लगावला होता.

हेही वाचा : “पक्ष तोडांने कसा फोडतात, याचं…”, शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी दीपाली सय्यद यांचा संजय राऊतांवर प्रहार

“संजय राऊत यांचा अभिमान आहे. आमच्यासाठी आज खरा दिवाळीचा दिवस आहे. संजय राऊतांच्या जामीनामुळे शिवसेनेचा सेनापती परत आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचं बळ आलं आहे, असेही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यात आपण हुकूमाशाहीच्या दिशेने…”

“संजय राऊतांना जामीन मिळाला, याचा आनंद आहे. खरं बोलणारा प्रत्येक नागरिक या निर्णयाचे स्वागत करतो आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या देशात, राज्यात आपण हुकूमाशाहीच्या दिशेने जातो आहे का? यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर दिली आहे.