मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नुकतंच उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद समोर आला आहे. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन” असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेतली आहे.

सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत चित्रा वाघ यांना खोचक सवाल विचारला आहे. उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर असाच आक्षेप तुम्ही कंगना राणौत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. त्यांनी फेसबूकवर अमृता फडणवीस यांच्यासह कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत हा सवाल विचारला आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील एक फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा- “मला भेटली तर थोबडवून काढेन…” उर्फी जावेदच्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक

सुषमा अंधारेंनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं, “मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त ‘कम्फर्टेबल’ आणि ‘कॉन्फिडंट’ वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव बहुतांशी वेळा साडीच असतो, फार फार तर मी सलवार सूट परिधान करते. यामुळे इतरांनीही माझ्यासारखाच पेहराव करावा, असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये ‘कम्फर्टेबल’ वाटतं, त्याप्रमाणे तो कपडे परिधान करतो. प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरजसुद्धा असते. उदाहरणार्थ, टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…”

हेही वाचा- “हे भगवं आइसक्रीम आहे, मी ते चाटणारच, यावर भाजपाचा…”, भगव्या बिकिनीच्या वादानंतर महिलेचा ‘तो’ VIDEO व्हायरल

“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया… पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल, तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेदसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणौत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का?” असा सवाल अंधारेंनी फेसबूक पोस्टद्वारे विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीझोतात आणि चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल…” असा टोला सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.