Pune Rape Case Accused Datta Gade: पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे भाऊ आणि आरोपीचे वकील वाजिद खान व साजीद शाह यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी वकील वाजिद खान म्हणाले की, आरोपीने गुन्हा केला की नाही? याचा निकाल न्यायालय देईल. आज ही पत्रकार परिषद घेण्यामागची भूमिका संरक्षण मिळावे, अशी आहे. आम्ही आरोपीची बाजू मांडत आहोत, म्हणून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर रिल पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षणाची गरज भासू लागली आहे. यापुढे एखाद्या बलात्कारातील आरोपीचा खटला वकिलाने लढावा की नाही? इतपत परिस्थिती चिघळली आहे. कुणीही उठून फोन करून त्रास देत आहे, अशी भूमिका वकील वाजिद खान यांनी मांडली.

यावेळी आरोपीचे भाऊ म्हणाले, आरोपी दत्ता गाडे गुलटेकडी भाजी मार्केट यार्डममध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. भाजीपाला विकून येत असताना स्वारगेट बस डेपोमध्ये सदर प्रकार घडला. आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. न्यायालयावरही आमचा विश्वास आहे. ज्या पीडित महिलेबरोबर घटना घडली, त्यांनाही न्याय मिळायला हवा. न्यायालय जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल. न्यायालयाने दत्ता गाडेला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला मान्य आहे. त्याचे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.

नाण्याची दुसरी बाजू समोर यावी

माध्यमाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली. चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी, असे आवाहन आरोपी दत्ता गाडेचे भाऊ यांनी केले.

“गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आमच्याशी संपर्क ठेवण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही”, असेही आरोपीच्या भावाने सांगितले. तसेच पत्रकारांनी यावेळी दत्तात्रय गाडेच्या विरोधात सहा गुन्हे दाखल असल्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, त्याच्यावरील गुन्ह्यांची आम्हाला कल्पना आहे. सहापैकी एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे आपण त्याच्याशी फार बोलत नव्हतो, असेही गाडेच्या भावाने सांगितले. तसेच तो गावातून भाजीपाला उचलून शहरात आणून विकण्याचे काम करत होता. तो माझा भाऊ असला तरी तो जर गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे, अशीही स्पष्ट भूमिका गाडेच्या भावाने मांडली.