Maharashtra Cabinet Expansion : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता पुढच्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणत्या पक्षाला कोणती खाते देण्यात येणार? तसेच कोणत्या नेत्यांना कोणतं मंत्रिपद देण्यात येतं? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र, महायुतीमधील नेत्यांमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरु केल्याचीही चर्चा आहे.

यातच महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाट्याला मर्यादीत मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता आहे. यातच काही नेत्यांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आता यावरच शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘मंत्रि‍पदे देताना प्रत्येकाचं रिपोर्ट कार्ड असतं’, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…

तानाजी सावंत काय म्हणाले?

विरोधकांनी बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी देखील मारकडवाडीत भेट दिली आहे. यावर बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, “संविधानाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने जो कौल दिला. तो कौल आम्ही महायुती म्हणून स्वीकारला. त्यानंतर त्याच जनतेने आम्हाला विधानसभेला बहुमत दिलं. मला वाटतं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीपासून चुका काय झाल्या? हे विरोधकांनी पाहावं. विरोधकांच्या आमदारांनी शपथ घेतली की नाही? हा त्यांचा प्रश्न आहे”, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जुन्या नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे का? अशी चर्चा आहे. तसेच तुम्हाला देखील पुन्हा मंत्रि‍पदाची संधी मिळेल का? या प्रश्नावर बोलताना तानाजी सावंत यांनी म्हटलं की, “प्रत्येकाचं रिपोर्ट कार्ड असतं. २०२२ मध्ये आम्ही जे सत्तांतर केलं, त्यानंतर माझ्याकडे आरोग्य खातं देण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याला मी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आमच्या महायुतीमधील तिन्ही नेते मंत्रिमंडळाच्या विस्तराबाबत चर्चा करतील. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील. तसेच मला पुन्हा संधी मिळेल की नाही? हा माझ्या नेत्याचा विषय आहे. ते जी जबाबदारी टकतील ती जबाबदारी पार पाडेल”, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.