इस्लामपूरमध्ये आढळलेल्या २६ करोनाग्रस्तांपैकी १० जण करोनामुक्त झाले असून त्यांना मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतनमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये १४ दिवसांसाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी इस्लामपूर येथे मुंबईहून आलेल्या एकामध्ये करोनासदृश लक्षणे आढळून आल्याने अधिक तपासणीसाठी त्याला सांगलीला आणण्यात आले आहे.

इस्लामपूर येथे सौदी अरेबियाहून परतलेल्या एका कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचे २३ मार्च रोजी निष्पन्न झाले. याचबरोबर या कुटुंबाच्या संपर्कातील आणखी २२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे नंतर स्पष्ट झाले. एकाच वेळी इस्लामपूरमध्ये २६ करोनाबाधित आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले. इस्लामपूर येथे टाळेबंदीची गेले आठ दिवसांपासून सक्तीने अंमलबजावणी करण्यात येत असून २८ मार्च नंतर जिल्ह्य़ात एकही करोनाबाधित आढळला  नाही.

दरम्यानच्या काळात करोनाग्रस्त आढळलेल्या रुग्णांचे १४ दिवसांनंतर स्वॅबचे नमुने मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेण्यात आले. १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर २४ तासात दोन वेळा करोना चाचणी घेतली जात असून या  दोन चाचण्यांमध्ये १० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या करोनामुक्त झालेल्या रुग्णांना १४ दिवसांसाठी मिरजेतील शासकीय तंत्र निकेतनमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर वैद्यकीय तज्ञाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे.

मिरजेतील करोना रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या १६ करोनाबाधित रुग्णांमध्ये एका २ वर्षांच्या मुलाचा समावेश असून त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनाही करोनामुक्त असूनही रुग्णालयात राहावे लागत आहे, असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले. या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून १४ दिवसांचा कालावधी जस-जसा समाप्त होईल त्या प्रमाणे या रुग्णांची करोना चाचणी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये मिरजेत ३६, इस्लामपूरमध्ये २६ आणि शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे ७ जण दाखल आहेत. जर परदेश प्रवासाहून आलेले, संशयित आणि करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या १  हजार २३५ जणांना अलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. यापैकी  ५२२ जणांचा हा कालावधी संपला आहे. तर उर्वरित ७१३ जणांना गृहबंद राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, इस्लामपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटीलनगरमध्ये एकाला ताप आला असून तो मुंबईहून आलेला आहे. त्याच्यामध्ये अन्य कोणतीही  लक्षणे आढळली नसली तरी खबरदारी म्हणून गुरुवारी त्याला अधिक उपचारांसाठी सांगलीला हलविण्यात आले आहे. त्याच्या स्वॅबचे नमनेही मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आज रात्री उशिरा मिळण्याची शक्यता आहे.