सातारा : भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षात धुसफुस आहे. सेनेचे काही मंत्री, आमदार माध्यमांवर सतत वेगवेगळी मतप्रदर्शने करत असतात. याविषयी चर्चा होत असते. हे आम्हाला माहीत आहे. मात्र आम्ही सरकार चालवताना नेहमी समन्वयाला प्राधान्य देतो आणि गैरसमज होणार नाही याची काळजी घेतो, अशी कबुली सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली. शाहिरी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी साताऱ्यात आल्यानंतर शेलार माध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. अतुल भोसले. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, मदन भोसले, आमदार मनोज घोरपडे आदी उपस्थित होते.

महायुतीतील दोन पक्षांमध्ये धुसफुस असल्याची कबुली देताना शेलार म्हणाले, की जरी सहकारी पक्षाकडून माध्यमांसमोर मतप्रदर्शने होत असतील तरीही आमची समन्वयाची भूमिका आहे. साताऱ्यात पाटण येथील सत्यजित पाटणकर यांना भाजप प्रवेश देत असताना पर्यटन व पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कोंडी करण्याचा कोणताही विषय नाही. त्यांना पक्षप्रवेश देऊ नये म्हणून जर कोणी मुख्यमंत्र्यांना भेटले असेल तर यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. शंभूराज देसाई हे महायुतीतील अनुभवी नेते आहेत. आमच्यात गैरसमज होणार नाहीत याची चिंता आम्ही करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांच्याशी मुख्यमंत्री बोलले आहेत. त्यामुळे याविषयी मी अधिक बोलू शकत नाही, असेही शेलार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे बंधू एकत्र आल्यावर प्रतिक्रिया

ठाकरे बंधू आणि दोन्ही पवारही एकत्र येणार आहेत, हे त्या दोघांनाही माहीत आहे का? अगोदर त्यांना एकत्र येण्याबाबत ठरवू द्या? दोघांपैकी कोणीही त्याबद्दल एकमेकांना सांगू द्या. त्यानंतरच आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ असे खोचकपणे शेलार यांनी सांगितले. तर सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तसेच सातारा शहरातील खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन्ही आघाड्या स्वतंत्र निवडणूक लढवणार की, एकत्र याबाबतचा निर्णय जिल्हाध्यक्ष अतुल भोसले घेतील. त्यांनी पक्षपातळीवर कळवल्यानंतर याबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल असेही शेलार म्हणाले.