अलिबाग – मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने १५ ते १६ वाहनांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे खंडाळा घाटात तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले व तो समोरील वाहनांना धडक देत तसाच पुढे जात राहिला. दिड ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एकामागून एक वाहनांना धडक दिली. ज्यात लहान वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढून खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या २० ते २५ प्रवाशांना खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात आणले आहे.
दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.