अहिल्यानगर: मनसेच्या जवळकीमुळे ठाकरे गटच संभ्रमात असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज, शुक्रवारी नगरमध्ये बोलताना केला आहे.
उदय सामंत म्हणाले, जेव्हा मनसेने टाळीसाठी हात पुढे केला, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तो अव्हेरला, त्यानंतर काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असतानाही उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. अशा स्थितीत दोन्ही ठाकरे बंधू नक्की एकत्र येणार का? असा संभ्रम उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांत आहे, असा दावा त्यांनी केला. नगरमध्ये आयोजित युवा व नाट्य संमेलनाच्या समारोपासाठी मंत्री सामंत नगरला आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे अंतिम निर्णय घेणार आहेत. नगर जिल्ह्याच्या स्तरावर राष्ट्रवादी व भाजपचे काही नेते निर्णय प्रक्रियेत असले तरी आमच्या शिंदे सेनेचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपमुख्यमंत्री शिंदे यांना मानतात, त्यामुळे आमच्याकडून सर्व अंतिम निर्णय शिंदे हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हैदराबाद गॅझेट संदर्भात सुरू झालेल्या वादावर भाष्य करताना सामंत म्हणाले, मंत्रिमंडळ उपसमितीचा मीही सदस्य होतो. हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन जीआर काढला आहे. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांचे काही गैरसमज झाले असतील तर मंत्रिमंडळाच्या दोन्ही उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे व चंद्रशेखर बावनकुळे हेही एकमेकांशी चर्चा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ ओबीसी विषयावर न्यायालयात गेले असल्याने हा महायुती विसंवाद व अविश्वास नाही का, या प्रश्नावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले तुम्हा पत्रकारांना काय अर्थ काढायचे ते काढा. पण मंत्री भुजबळ यांच्या शंका दूर करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहेत. तरीही विखे पाटीलही त्यांच्याशी यासंदर्भात बोलणार आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याबद्दल मत व्यक्त करताना मंत्री सामंत म्हणाले आंदोलने हा लोकशाहीचा अधिकार आहे. परंतु, ते शेतकऱ्यांना पटवू शकतील का, हा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांचा हा प्रयोग असफल झालेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे बहुदा ते हे आंदोलन करीत असावेत.
महिला, युवक व बाल संमेलने
दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर आता राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे युवा, महिला व बाल यांच्यासाठी अखिल भारतीय स्तरावर साहित्य संमेलने घेण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र लंडनमध्ये दोन महिन्यांत सुरू केले जाणार आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांची जागा खरेदीही झाली आहे, असेही मराठी भाषा मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
नवे औद्योगिक धोरण चार-पाच दिवसांत
येत्या चार-पाच दिवसांत नवे औद्योगिक धोरण जाहीर केले जाणार आहे. यात जेम्स अँड ज्वेलरी, बांबू, संरक्षण साहित्य व अन्य १२ उद्योग सुरू करण्याचा मानस आहे. नेक इन इंडिया अंतर्गत बंदुका, रणगाडे, पूल निर्मिती असे संरक्षण साहित्य निर्मितीचेही नियोजन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.