आज राज्यपालांनी जे भाषण केलं त्यात महाविकास आघाडीच्या काळातलीच कामं आणि निर्णय होती. राज्यपालांचं भाषण ऐकून आम्हाला असं वाटलं की त्यांची दिशाभूल वगैरे केली का? असं आम्हाला वाटलं आहे त्याबाबत आम्ही माहिती घेणार आहोत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर एकनाथ शिंदे काहीही म्हणू द्या.. त्यांनी सहा महिन्यात बारावं कारण दिलंय पण एक लक्षात घ्या की गद्दार हे गद्दारच असतात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेबाबत?

एकनाथ शिंदे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, तसंच त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी होती. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मागच्या सहा महिन्यात गद्दारी करण्याचं हे बारावं कारण दिलं आहे. त्यामुळे आता काय बोलणार? एक लक्षात घ्या जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार त्यांच्यावरचा तो शिक्का पुसला जाणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

गद्दारांनी काहीही आश्वासनं पाळली नाहीत

जे गद्दार बोलत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. विविध घोषणा महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये झाल्या आहेत. विविध वचनं देण्यात आली मात्र गद्दारांनी काहीही वचनं पूर्ण केली नाहीत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या प्रांगणात आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच त्यांना पक्ष कार्यालयाचं काय होणार? असं विचारलं असता आता लवकरच आम्ही तुमच्यासोबत येऊन बसतो असंही त्यांनी मिश्कीलपणे म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?

सभागृहात आम्ही जिथे बसायचं तिथेच बसलो होतो, गद्दार कुठे गेलेत ते त्यांनाच विचारा असं म्हणत आणखी एक टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना लगावला आहे.