विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत त्या आज (७ जुलै) एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. गोऱ्हेंनी ठाकरे गट सोडणं हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत. गोऱ्हे यांनी आज ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात रीतसर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. आमदार अनिल परब यांनी गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे. आमदार परब म्हणाले, “शिवसैनिकांच्या मेहनीतवर नीलम गोऱ्हे यांनी चार वेळा आमदारकी उपभोगली. याबद्दल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. परंतु ज्या शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी ही सगळी पदे उपभोगली, त्या शिवसैनिकांना हे पाहून (नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटातील प्रवेश) किती यातना होत असतील, याचा विचार करावा.

आमदार अनिल परब म्हणाले, आपल्याला काही मिळत नाही, म्हणून पक्ष सोडणारे भरपूर आहेत, असं असलं तरी पक्षाच्या वाईट दिवसात लाखो कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे असे संधीसाधू लोक गेले असतील, तर त्यांची जागा आम्ही नक्कीच भरून काढू. त्याची काळजी आम्ही करत नाही. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की, अशी सगळी पदं उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणं आणि वार करणं हे उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांना शोभत नाही.

हे ही वाचा >> “विधान परिषदेचा अर्ज भरण्याच्या दहा मिनिटे आधी फोन आला अन्…”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातली खदखद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार अनिल परब म्हणाले, नीलम गोऱ्हे आता शिंदे गटात गेल्या आहेत. त्यावर मी इतकंच सांगेन की, त्यांना जी काही आश्वासनं मिळाली असतील किमान ती पूर्ण व्हावीत, एवढीच आमची अपेक्षा आहे. ना इकडच्या ना तिकडच्या अशी त्यांची अवस्था होऊ नये.