प्रबोध देशपांडे

अकोला : शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांसाठी गत दोन दशाकांपासून प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कार्याला सलाम करण्याकरिता रविवारी बुलढाण्यात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी, कष्टकरी व मित्र परिवाराने लोकवर्गणीतून एक चारचाकी वाहन घेतले आहे. शेतकऱ्यांच्या साक्षीने रविकांत तुपकर यांना सन्मानपूर्वक हे वाहन प्रदान केले जाणार आहे. बुलढाणा शहरातील एका खासगी सभागृहात १२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी, ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ राहणार आहेत. आदर्श गाव हिवरे बाजाराचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच आरोग्य मंत्रालय भारत सरकारचे सचिव ओमप्रकाश शेटे, प्रसिद्ध लेखक, निवेदक संदीप काळे यांची देखील प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी, यासाठी तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन-कापूस आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या पदाचा देखील राजीनामा दिला होता. स्वत:चे आयुष्य समाजासाठी जगणारा, लढणारा नेता जपणे ही समाजाची जबाबदारी आहे, या भावनेतून शेतकरी व मित्रपरिवाराने त्यांना नवे चारचाकी वाहन घेऊन देण्यासाठी लोकवर्गणीचा निश्चय केला आणि पाहता पाहता हा निश्चय पूर्णत्वास गेला.