नगरः नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने नगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) नगर उपविभागाच्या दोघा अभियंत्यांविरुध्द तब्बल १ कोटी रुपये लाच स्विकारल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील सहायक अभियंता (वर्ग २) अमित किशोर गायकवाड (३२, रा. प्लॉट नं २ आनंदविहार नागापुर, नगर, मुळ रा. चिंचोली ता. राहुरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याने लाखांची ही रक्कम स्वतःसाठी तसेच एमआयडीसीचे नगरमधील तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्याकरीता स्वीकारली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने काल, शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. लाच स्विकारतानाच्या गुन्ह्यात महाराष्ट्रात प्रथमच १ कोटी रुपये जप्त करण्याची कारवाई झाल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात होता.
हेही वाचा… “सरकारने ताणून धरलं तर…”, अल्टिमेटमच्या घोळावरून जरांगेंचा इशारा; म्हणाले, “आता शंका-कुशंका…”
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नगर येथील औद्योगिक विकास महामंडळअंतर्गत १०० एमएम व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम केले होते. या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे देयक मिळावे म्हणून तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याची मागील तारखेचे ‘आउटवर्ड’ करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या कामाचे व यापुर्वी अदा केलेल्या काही देयकांची ‘बक्षिसी’ म्हणुन १ कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. तशी तक्रार शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी नगर – संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बाह्यवळण रस्त्यावर आनंद सुपर मार्केट इमारतीच्या बाजुला सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची १ कोटी रूपयांची रक्कम गायकवाडने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्विकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची ५० टक्के कोठे पोहचवावी, असे विचारले. त्यावर वाघने सांगीतले की, ‘राहु दे तुझ्याकडे, बोलतो मी तुला. ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी. सांगतो नंतर. सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवुन दे’, असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक विश्वास नांगरे पाटील हे अहमदनगरमध्ये दाखल झाले. तपासाबाबत त्यांनी सूचना दिल्या. संशयितांच्या घरांच्या झडतीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याचे सांगितले जाते.