पारनेर, कोल्हापूरमधील रुग्णसंख्या वाढीचा परस्परसंबंध शोधणे आवश्यक

तालुक्याच्या उत्तरेला आदिवासी बहुल भागात पोखरी, वनकुटे, खडकवाडी या गावांत रुग्णांची संख्या वाढलेली आहे.

corona update in maharashtra
करोना विषाणू (प्रातिनिधिक छायाचित्र)

|| संजय वाघमारे 

पारनेर : पारनेर (नगर) सह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात करोना विषाणूचा नवा प्रकार निर्माण झाल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पारनेर आणि कोल्हापूरमधील रुग्णवाढीचा परस्परसंबंध शोधण्याचा प्रयत्न जिल्हा, तालुका प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे.

पारनेर तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर कुटुंबे वीट भट्टीच्या व्यवसायामुळे कोल्हापूर शहरात स्थिरावली आहेत. वीट भट्टीसाठी लागणारे मजूर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी बहुल पट्ट्यातून दरवर्षी कोल्हापूरला नेण्यात येतात. पावसाळा सुरू झाल्यावर वीट निर्मितीचे काम थंडावते व पावसाळ्यातील चार महिने कोल्हापूर येथे वीट भट्टीवर काम करणारे मजूर आपापल्या गावी परततात. कोल्हापूरमध्ये वीट भट्टीवर काम करणारे सुमारे दीड हजार मजूर पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात परतले आहेत.

ढवळपुरी, वनकुटे, पोखरी, सुतारवाडी तसेच वावरथ, जांभळी (राहुरी) या परिसरातील विविध तांड्यावर, वाड्यांवर राहणारे मजूर मोठ्या संख्येने कोल्हापूर येथून आपापल्या गावी परतल्याने या मजुरांच्या माध्यमातून विषाणूचा नवा प्रकार तालुक्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता गृहीत धरून कोल्हापूर येथून तालुक्यात परतलेल्या मजुरांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी, संसर्ग तपासणी होणे आवश्यक आहे.

तालुक्याच्या उत्तरेला आदिवासी बहुल भागात पोखरी, वनकुटे, खडकवाडी या गावांत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्याच बरोबर या परिसरातील गावांचा बाजारपेठेच्या निमित्ताने नियमित संबंध येणाऱ्या टाकळी ढोकेश्वार, भाळवणी येथील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथून परतलेल्या मजुरांच्या माध्यमातून तालुक्याच्या उत्तर भागात संसर्ग पसरला आहे किंवा नाही याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

जनुकीय संरचनेत बदल झालेला नव्या प्रकारचा विषाणू निर्माण झाल्याबाबत प्रयोगशाळेकडून कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. तालुक्याच्या पश्चिाम भागात पिंपरी जलसेन, निघोज, लोणीमावळा येथे झालेल्या लग्नांमुळे या परिसरात करोना संसर्गाचा फैलाव झाला असावा. या गावांसह तालुक्यातील २२ गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. – ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The correlation of patient growth in parner kolhapur needs to be explored akp

ताज्या बातम्या