आमदार निलेश राणे यांचा आरोप
भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही. त्यामुळेच आरक्षणासाठी मराठा समाजाला संघटितपणे रस्त्यावर उतरावे लागेल, असा, इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शनिवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात राणे बोलत होते. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र निंबाळकर, नगरसेवक कुमार वाकळे, सोमनाथ कराळे. कृषीराज टकले आदी यावेळी उपस्थित होते.
राणे म्हणाले, राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी लाखो लोकांशी चर्चा करून आरक्षणाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. या अहवालाच्या आधारावरच सरकारने मराठा समाजाला आरक्षण लागू केले. मात्र पुढे ही बाब न्यायप्रविष्ट झाली असून त्यालाही विरोध करणारे नारायण राणे हेच पहिले नेते होते. सध्याच्या राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ राज्य सरकार किंवा भाजप-शिवसेनाचा नव्हे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मराठा आरक्षणाला विरोध आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणे दुरापास्त होईल. मात्र तसे होऊ नये यासाठी रस्त्यावर उतरून राज्य सरकारला संघटित ताकद दाखवून द्यावी लागेल, असे राणे म्हणाले.