सातारा: दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण असून, जिहे कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे- कठापूर) उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी राणंद येथील तलावात पोहोचले. या वेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सोनिया गोरे, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते. जिहे कठापूर योजनेचे पाणी राणंद तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून, त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, ‘दुष्काळमुक्ततेसाठी शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे.

तसेच कोकणातील पाणी समुद्राद्वारे वाया जाते ते पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात येणार आहे, ही योजना येत्या पाच वर्षांत पूर्ण होईल.’जिहे कठापूर योजनेचे पाणी साठ हजार हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे. २०२८ पर्यंत पाणी संपूर्ण माण व खटाव तालुक्याला मिळेल. ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. माण व खटाव तालुका दुष्काळमुक्त करण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले, २००९ साली आमदार झालो. त्यापासून माण खटाव पाणी मिळावे यासाठी उद्दिष्ट निश्चित करून पाठपुरावा केला. त्याचे आज फलित जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणातून आज राणंद तलावात आले. त्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना होत आहे. माझ्या पाठीशी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. त्यांनी पाण्याचे फेरवाटप करून पाणी माण खटावला दिले. त्याचे फलित म्हणून माण खटाव हिरवे गार झाले असून ऊसाचे क्षेत्र हे वाढले आहे. इतर गावांत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सोळशी धरणाचा निर्णयही घेतला पाहिजे तसेच या धरणातून अडीच टीएमसी पाणी या भागाला दिले पाहिजे. तसेच जिहे कटापूर योजनेतील उर्वरित कामांचे टेंडर ही तीस दिवसात काढावे, असेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.जलपूजन कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.