डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांना अखेर आज (गुरुवार) निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. भडंगे यांनी एका संशोधक विद्यार्थिनीस ५० हजार रुपयांची मागणी करून धमकावल्याप्रकरणी एक तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यासह कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडेही करण्यात आली होती. शिवाय संशोधक विद्यार्थिनी व डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्यातील पैशांच्या व्यवहाराशी संबंधित संवादाची ध्वनिफितही समाजमाध्यमात पसरली होती. त्याची दखल घेऊन कुलगुरू डॉ. येवले यांनी आज काढलेल्या आदेशान्वये डॉ. उज्ज्वला भडंगे यांना निलंबित करण्यात आल्याचे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.

संशोधक विद्यार्थिनीसह काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेकडूनही (एनएसयूआय) कुलगुरूंना बुधवारी निवेदन देऊन भडंगे यांनी ५० हजार रुपयांची मागणी करून धमकावण्यासारखा प्रकार केल्याची तक्रार केली होती. शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे या महिला असल्या तरी त्यांना पाठीशी न घालता तत्काळ कारवाई करून त्यांचे मार्गदर्शकपद रद्द करावे व बडतर्फ करावे, अशी मागणी केली होती. या प्रकारामुळे विद्यापीठात काही विद्यार्थी संघटनांकडून भीक-मांगो आंदोलन देखील करण्यात आले. विद्यापीठाने सायंकाळी डॉ. भडंगे यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आदेशानुसार भडंगे यांच्या तक्रारीतील मजकुर पाहता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बांधिल असलेल्या या विद्यापीठात असे प्रकार होणे हे गंभीर स्वरुपाचे वाटते. त्यामुळे हा प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार ‘‘गैरवर्तन‘‘ या संज्ञेत मोडत आहे. कुलगुरुंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनिमानुसार शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांना निलंबित केले आहे, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान, संशोधक विद्यार्थिनीला ५० हजार मागितल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाणे व कुलगुरूंपर्यंत पोहोचल्यानंतर बुधवारी डॉ. भडंगे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्यांच्यावरील खंडणी मागितल्याच्या आरोपाचे लोकसत्ताशी बोलताना खंडण केले होते.