राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आज विठ्ठला चरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी अहमदपूरच्या वारकरी चव्हाण दाम्पत्याला या महापूजेचा मान मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल मंदिरात दाखल झाले. त्यानंतर २ वाजून २५ मिनिटांनी पूजेला सुरुवात झाली, पुढे दीडतास मंत्रोच्चाराने ही पूजा चालली. परंपरेप्रमाणे दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळत असतो. हा मान यंदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी सुनेवाडी तांडा गावातील वारकरी दाम्पत्य विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण यांना मिळाला.

महापूजेनंतर येथे मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी त्यांचा मंदिर समिती आणि मराठा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी मला या ठिकाणी येता आलं नाही तरी याची मला खंत नाही. कारण विठ्ठलाचा तसा आदेशच होता की, मी केवळ पंढरपूरात नाही तर तुमच्या मनात आहे त्यामुळे तुम्ही जिथे माझी पुजा कराल तिथे मी आहे. मात्र, त्यामुळे माझ्या वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची पुजा करण्याची संधी मला मिळाली.

मराठा आणि धनगर समाजासह इतर विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी विठ्ठलाचा आशिर्वाद मिळाला. यासाठी सत्काराची गरज नव्हती कारण मी माझे कर्तव्य पार पाडण्याचे काम केले. आपल्या कामांच्या यशापयशाचे मुल्यमापन जनता करेलच. त्यामुळे विठ्ठलरुपी जनतेची सेवा करण्याकरीता पाच वर्षांसाठी पुन्हा संधी मिळेल याची आशा करतो, अशा शब्दांत त्यांनी पुढील सरकार आपलेच असेल असा विश्वास व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The hopes aspirations expectations of the people of maharashtra cm requested to vitthal aau
First published on: 12-07-2019 at 07:26 IST