२१ जून २०२२ मागच्या वर्षीचा हा दिवस आठवा. सगळ्या माध्यमांमध्ये एकच बातमी सुरु होती. ‘एकनाथ शिंदे नॉट रिचेबल’ हीच बातमी सगळ्या माध्यमांमध्ये प्रसारित होत होती. एकाहून एक ‘ब्रेकिंग न्यूज’ सुरु झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी आपलेच नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत मुंबईहून थेट सुरत गाठलं. सुरतला त्यांच्यासह १६ आमदारही गेले. १६ आमदारांची संख्या पुढच्या तीन दिवसांमध्ये चाळीस झाली. आधी सुरत, मग गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्यातून महाराष्ट्रात अशा ३० तारखेपर्यंत अनेक घडामोडी घडल्या आणि २९ जून २०२२ ला महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं.
शिवसेनेत झालेलं एकनाथ शिंदेंचं बंड सर्वात मोठं का?
शिवसेनेत बंड होणं ही काही नवी बाब नाही. सर्वात पहिलं बंड केलं होतं ते छगन भुजबळ यांनी. छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार. मुंबई महापालिकेत जेव्हा शिवसेनेची सत्ता आली तेव्हा ते शिवसेनेचे पहिले महापौरही होते. त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे खूप सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र पक्षातल्या अंतर्गत बंडाळ्यांमुळे छगन भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे अशी कितीतरी नावं घेता येतील. अगदी बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचा पुतण्या आणि अंगा खांद्यावर खेळवलेला राज अर्थातच राज ठाकरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मात्र या सगळ्यांच्या जाण्यानंतरही शिवसेना अभेद्य राहिली. मात्र या सगळ्या नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंचं बंड वेगळं ठरलं.
एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वात मोठं का?
२०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जेव्हा त्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा शिवसेनेकडे ५६ जागा आल्या होत्या तर भाजपाकडे १०५ जागा. याचाच अर्थ भाजपा आणि शिवसेना युतीला महाराष्ट्राने स्पष्ट कौल दिला होता. मात्र भाजपासह जाण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसह जाणं आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारणं पसंत केलं. भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरुनही विरोधात बसला. या सगळ्या घडामोडींविषयी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे नाराजच होते. एकनाथ शिंदे यांनी स्वतःच या गोष्टी मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात सांगितल्या. महाविकास आघाडी सरकार बसलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र शिवसेनेचे आमदार जास्त असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी मिळू लागला. तसंच हिंदुत्ववादी म्हणून काही विशिष्ट भूमिका घेणं हे टाळलं जाऊ लागलं. यातून एकट्या एकनाथ शिंदेंचीच नाही तर त्यांच्यासह गेलेल्या ४० आमदारांची नाराजी वाढली. त्यातूनच हे बंड घडलं. हे सर्वात मोठं अशासाठी ठरलं की शिवसेना सत्तेत असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटून आणि सत्ता सोडून त्यावेळच्या विरोधी पक्षाकडे म्हणजेच भाजपाकडे जाणं पसंत केलं. शिवसेनेत आत्तापर्यंत असं कधीही घडलं नव्हतं त्यामुळे हे बंड वेगळं ठरतं यात शंकाच नाही.
२१ जून २०२२ ते ३० जून २०२२ काय काय घडलं?
२१ जून २०२२ ला बंड झालं सुरुवातीला एकनाथ शिंदेंसह १६ आमदार गेले होते. त्यानंतर ही संख्या ३२ त्यानंतर ४० झाली. एकनाथ शिंदेंना नंतर शिवसेनेच्या महाराष्ट्रातल्या १८ पैकी १३ खासदारांचीही साथ लाभली. मविआ सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित मानलं गेलं होतं. जे २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कोसळलं. त्यानंतर उजाडला ३० जून २०२२. या दिवशी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच त्याच दिवशी दोन शपथविधी पार पडले. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मविआ सरकार कोसळल्याने विरोधी पक्षात त्यांना बसावं लागलं. शिवसेनेत उभी फूट पडल्याने त्यांचं विधानसभेतलं संख्याबळ कमी झालं आणि मविआच्या तीन पक्षांमध्ये म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला आणि अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले.
एकनाथ शिंदे यांच्या जवळ शिवसेनेचे नाव-चिन्ह
एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर दोन्ही गटांची लढत पक्षावर आली. दोन्ही गटांनी निवडणूक आयोग गाठून पक्षावर दावा केला. आम्हीच खरी शिवसेना आहोत असं दोन्ही पक्षांनी म्हटलं होतं. या प्रकरणी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव, निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला देऊन टाकलं. सर्वाधिक खासदार आणि आमदारांचा पाठिंबा असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं.
शिंदे-उद्धव ठाकरेंकडे किती खासदार-आमदार आहेत?
निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या दाव्याबाबतच्या निर्णयात एकनाथ शिंदे गटाला २०१९ मध्ये विजयी झालेल्या शिवसेनेच्या एकूण ५६ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला १६ आमदारांचा पाठिंबा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. या १८ पैकी १३ खासदार हे शिंदे गटात आहेत.
एकनाथ शिंदेंचं बंड हे शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं आहे. या बंडाला आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींना एक वर्ष पूर्ण झालं आहे. आता पुढे या दोन्ही गटांमधला कलगीतुरा कसा रंगणार? राजकीय डावपेच कसे खेळले जाणार? निवडणुकांचं काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यातच आहेत. मात्र एक वास्तव नाकारता येणार नाही की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आता उद्धव ठाकरेंकडे नसून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळेच येत्या काळातलं उद्धव ठाकरेंसमोरचं आव्हानही मोठं आहे.