मालमत्ता कर थकीत ठेवणाऱ्या नागरिकांची नावंआ आता सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचा इशारा वर्धा नगर परिषदेने दिला असून, नागिराकांनी स्वतःवर अशी वेळ येऊ देऊ नये असे आवाहनही केले गेले आहे.

नगर परिषदेचा मालमत्ता कर व पाणीपट्टी ३१ मार्च पूर्वी भरणे अनिवार्य आहे. विलंब झाल्यास थकीत रक्कमेवर दरमहा दोन टक्के दंड आकारल्या जातो. याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्याचे परिषद प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र तरीही नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने थकबाकीदारांची नळजोडणी त्वरीत खंडीत करण्याची तंबी देण्यात आली आहे. त्यानंतर आता अशा नागरिकांची नावं समाजमाध्यमांवर तसेच विविध चौकात फलक लावून प्रसिध्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रथम नोटीस देण्यात येईल. त्यानंतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाही नगर परिषदेच्या धडक कर वसूली पथकामार्फत करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करून लिलावाच्या रक्कमेतून मालमत्ता कर वसूल करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे खुल्या भूखंडावरील कराची थकबाकी असेल, त्यांच्या रिकाम्या जागेवर नगरपरिषदेची मालमत्ता असा फलक लावून तो भूखंड जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. म्हणून थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी कर भरणा करून अप्रिय घटना टाळण्याचे आवाहन वर्धा नगर परिषदने केले आहे. कर वसूलीसाठी नेमण्यात आलेल्या ९ करवसूली पथकांना सहकार्य करण्याची विनंतीही केली गेली आहे.