एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राज्यातील संकटग्रस्त ४५ प्रजातींच्या पक्ष्यांची यादी जाहीर केली असून त्यात अतिदुर्मीळ झालेल्या माळढोक पक्ष्याचा उल्लेख आहे. सोलापुरात नान्नज येथील माळढोक अभयारण्यात अधूनमधून एकच माळढोक पक्ष्याचे दर्शन घडते. नामशेष होत चाललेल्या माळढोकला वाचविण्यासाठी कृत्रिम प्रजनन हाच एकमेव पर्याय राहिला आहे. त्यादृष्टीने नजीकच्या इंदापूर तालुक्यातील कवंढाळी येथे वन खात्याच्या शंभर हेक्टर क्षेत्रात माळढोक कृत्रिम प्रजनन केंद्र उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असले तरी यात राजकीय इच्छाशक्ती खरी गरज बनली आहे.




देशात अतिदुर्मीळ झालेल्या माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व राखण्यासाठी राजस्थानात माळढोक कृत्रिम प्रजनन केंद्र उभारण्यात आले असून सध्या तेथे १६ पेक्षा जास्त पिल्ले आहेत. याच धर्तीवर सोलापुरात नान्नज अभयारण्याच्या परिसरातही कृत्रिम प्रजनन केंद्र उभारण्यासाठी वन्यजीव विभागाने यापूर्वीच प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे. त्यासाठी इंदापूरजवळील कवंढाळी गाव सुचविण्यात आले आहे. या कृत्रिम प्रजनन केंद्रासाठी सुमारे ४० कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यादृष्टीने राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची ठरणार आहे.
सुमारे १२२९ चौरस किलोमीटर क्षेत्रात असलेल्या नान्नज माळढोक अभरायण्याच्या परिसरात शेतीचे स्थलांतरण, दगड खाणकाम, शहरीकरण, उद्योगधंदे, ऊर्जा वाहिन्यांचा विस्तार, राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी खुली होणारी गवताळ मैदाने, बदलती शेती आदी कारणांमुळे ज्या गवताळ प्रदेशात माळढोक अधिवास करतात, तेथील त्यांचे अस्तित्व झपाटय़ाने धोक्यात आले आहे. सध्या नान्नज अभयारण्य परिसरात सुमारे पाच वर्षांची प्रौढ मादी दिसून येते. १५ दिवसांपूर्वीच या पक्ष्याचे दर्शन झाल्याचे उपवन संरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण सांगतात. अधिवास नष्ट होणे आणि शिकारीसह अन्य अडचणींमुळे या पक्ष्याचे अस्तित्व कमजोर झाल्यामुळे त्यांचा प्रजनन दरही कमालीचा घटला आहे.
प्राप्त परिस्थितीत राजस्थानातून माळढोक पक्ष्यांची अंडी आणून कृत्रिम पध्दतीने उबवणे आणि प्रजनन करणे हा उपाय आहे खरा; परंतु कृत्रिम प्रजनन होणाऱ्या माळढोक पिल्लांचे संरक्षण आणि संवर्धन होणे तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षित क्षेत्र आणि नैसर्गिक अधिवासाच्या निर्मितीसह सुरुवातीची तीन-चार वर्षे कालावधीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट आॅफ इंडियाचे (डब्ल्यूआयआय) शास्त्रज्ञ डॉ. सुतीर्था दत्ता यांनी या अनुषंगाने उपाय सुचविले आहेत.
अखिल भारतीय पक्षी परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. निनाद शहा यांच्या मते माळढोक पक्षी वाचविण्यासाठी लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लोकसहभाग नसेल तर माळढोक पक्षी वाचविता येणे अशक्य आहे. दुर्दैवाने माळढोक पक्ष्याचा विकासाला अडथळा ठरल्याचा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे.