सातारा : जलजीवन मिशनचा प्रती व्यक्ती ५५ लिटर स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करणे हा उद्देश आहे. यासाठी टंचाईग्रस्त गावांनी पाणीस्रोत बळकटीकरणाची कामे प्राधान्याने करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनी केले.

सातारा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीस्रोत बळकटीकर आणि शाश्वततेबाबत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात माने बोलत होत्या. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. प्रज्ञा माने म्हणाल्या, जलजीवन मिशनचा उद्देश प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला ५५ लिटरप्रमाणे स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा आहे. यासाठी स्रोतांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. गावातील पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून मागणी आणि पुरवठा याचा अभ्यास करून त्यानुसार पीकपद्धती व पाणी वापर ठरवावा. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या पाच सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक मेघा शिंदे यांनी भूजल सर्वेक्षण विभाग, अटल भूजल योजनेची माहिती दिली. तसेच गावातील भूजल पातळी वाढवण्यासाठी पाणलोट व्यवस्थापनाचे विविध उपचार आणि त्याचे फायदे-तोटे समजावून सांगितले. पाणीस्रोत बळकटीकरणासाठी पारंपरिक व अपारंपरिक उपायोजना याविषयी माहिती दिली. जिल्हा तज्ज्ञ राजेश भोसले, मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीचे शकील मुजावर यांनी मार्गदर्शन केले. संवाद तज्ज्ञ अजय राऊत यांनी प्रास्ताविक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणीस्रोत बळकटीकरण व शाश्वतता हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, ‘नरेगा’ आणि कृषी या सर्व विभागांच्या जल व्यवस्थापनाबाबतच्या योजना समजावून सांगाव्यात. स्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक ठिकाणी कंपन्यांच्या सीएसआर, पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन आणि इतरही संस्थांचे सहकार्य घ्यावे. गावांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून कामे करावीत. – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा</p>