अकोले: धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी निळवंडे व भंडारदरा धरणातून सुरू असणारा विसर्ग थांबविण्यात आला आहे. दोन्ही धरणातून फक्त वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.
मागील पंधरा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर दोन तीन दिवसांपासून ओसरला आहे. मागील चार दिवसांत निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. पाऊस नसल्यामुळे धरणात होणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत होता. आज, शुक्रवारी सकाळी भंडारदराचा विसर्ग २ हजार ८० क्युसेक तर निळवंडेचा ४ हजार ५१६ क्युसेक होता.
धरणात होणारी पाण्याची आवक खूपच कमी झाल्यामुळे तसेच पाऊसही नसल्यामुळे दोन्ही धरणातून सुरू असणारा विसर्ग थांबविण्यात आला. आता फक्त वीजनिर्मितीसाठी धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. सायंकाळी भंडारदरा धरणातून वीजनिर्मितीसाठी ८४० क्युसेक तर निळवंडेमधून ८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
मुळा धरणातून सुरू असणारा विसर्गही १ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. सायंकाळी कोतुळ येथील मुळा नदीचा विसर्गही १ हजार ७५३ क्युसेक एव्हढा कमी झाला आहे. सायंकाळचे धरणाचे पाणीसाठे (दलघफू)- भंडारदरा ७ हजार ६५३ (६९.३३ टक्के), निळवंडे ६ हजार ८५९ (८२.३६ टक्के), मुळा १८ हजार २२६ (७०.१० टक्के).