स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वसामान्य माणसाला आपली सत्ता येईल अशी अपेक्षा होती. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीमुळे तशी परिस्थितीच नसल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केली. पलूस येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यही त्यासोबत मिळाले. मात्र अलीकडच्या काळात वैचारिक कोंडी निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे दुर्दैवाने दिसत आहे. हा वैचारिक दहशतवाद मोडून काढण्याची ताकद ग्रामीण साहित्यात आहे. या ताकदीचा वापर करुन साहित्यात नवनवीन विचारप्रवाह यायला हवेत. साहित्यामध्ये वास्तववाद आला तरच ते साहित्य कालातीत होऊ शकते, असे विचार शिंदे यांनी या व्यासपीठावर मांडले.  शिंदे यांनी या वेळी आपली ‘आई’ ही कविता सादर केली. त्याशिवाय राजकीय,सामाजिक विषयांवर विडंबनात्मक काही कविता सादर केल्या.
स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ आणि पलूस तालुका ग्रामीण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २५ वे साहित्य संमेलन पलूस येथे संपन्न झाले. प्रारंभी, स्वागताध्यक्ष वैभवराव पुदाले यांनी संमेलन आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी गावातून ग्रंथिदडी काढण्यात आली होती. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रामध्ये निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले. या कार्यक्रमास वामनराव होवाळ, बी. एन. हिर्डेकर, चंद्रकुमार नलगे, वासंती मेरू, कुंतिनाथ करके आदी उपस्थित होते.