“आरक्षणमुक्त भारत हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजवरची भूमिका राहिली आहे. गेल्या काही दिवसात सरसंघचालक मोहन भागवतांपासून तर सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी, याबाबत काहीशी मवाळ भूमिका घेत आरक्षणाला विरोध नसल्याचे वक्तव्य केले. मात्र, त्यांचा खरोखरच विरोध नसेल तर त्यांनी आधीची आरक्षणमुक्त भारत ही त्यांची भूमिका चुकीची होती, हे स्पष्टपणे मान्य करावे.”, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत व ओबीसी चळवळीचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. तसेच, या सरकारचा ‘रिमोट कं ट्रोल’ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आहे, असे देखील आज त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

तसेच, “देशातील काही राज्यात निवडणूकीचे वारे वाहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरलेली आहे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंधळ घातला आहे. यातून सावरण्यासाठीच सध्या संघाकडून आरक्षणाला विरोध नसल्याचे भासवले जात आहे. प्रत्यक्षात संघ आजही त्यांची आरक्षणमुक्त भारत या भूमिकेवर कायम आहे. पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत फसवणूक केली. संघाने कधीच संविधान मान्य केले नव्हते, तर त्यांनी कायम मनुस्मृतीचा आधार घेतला. समता, स्वातंत्र, बंधुत्व आणि न्याय ही वैश्विक मुल्य संघ मानत नाहीत. संघ हे वर्चस्ववादी राजकारण करणारे आहेत. सर्व देशाच्या नाड्यात हातात घेणे आणि विशिष्ट समुदायचे वर्चस्व प्रस्थापित करणे, हाच आदर्श ते मानत आले आहेत. संघ आतापर्यंत म्हणत होते की ते जातपात मानत नाही. मग आताच ते संसदेत आम्ही २७ ओबीसी मंत्री केलेत असे ढोल वाजवून का सांगत आहेत. ओबीसींचा एवढा कळवळा त्यांना कुठून आला?” असा प्रश्न प्रा. नरके यांनी उपस्थित केला.

याचबरोबर, “२७ लोकांना प्रतिनिधीत्व मिळाले, मंत्रीपद मिळाली हे मान्य आहे, पण प्रत्यक्षात हे सरकार केवळ दोनच माणसे चालवतात. त्यामुळे २७ घेतले काय किं वा २७० घेतले काय, त्यांना अधिकारच नाही. फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचे फक्त नाटक केले. ते किती आणि कसे खोटे बोलतात, याचे असंख्य पुरावे आहेत.” असेही प्रा. नरके यांनी सांगितले. तसेच, “आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर दबाव होता, तोच कित्ता आता गिरवला जात आहे. न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांवर अदृश्य नियंत्रण या सरकारकडून आणले जात आहे. या सरकारचा ‘रिमोट कं ट्रोल’ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आहे.”, असे शेवटी प्रा. हरी नरके पत्रकार परिषदेत म्हणाले.