संस्कृतचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी (८४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. मूळचे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील असलेल्या म. बा. कुलकर्णी यांनी मराठी व संस्कृतचे सुमारे ३२ वर्ष अध्यापन केले. रत्नागिरी येथील गोगटे महाविद्यालयात काही काळ अध्यापन केल्यावर त्यांनी नाशिकच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, बिटको महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालयात काम केले. संस्कृत भाषेचा चालता-बोलता कोश अशीच त्यांची ओळख होती. पुनर्जन्म, उपनिषदातील कथा, नव्याने रामकथा गाऊ, सोन्याचा पाऊस, भासाची जळालेली नाटके, पराक्रमी युवक अनंत कान्हेरे, मनू आणि स्त्री तसेच शब्दचर्चा ही त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
कुलकर्णी यांच्या ‘शब्दचर्चा’ पुस्तकास मागील वर्षी सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सोहळ्यात ग. वि. अकोलकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुस्तकात सुमारे एक हजार शब्दांचे अर्थ त्यांनी स्पष्टीकरणासह दिले. ‘व्यावहारिक सुभाषिते’ या पुस्तकातून संस्कृत सुभाषितांचा व्यावहारिक अर्थ त्यांनी सोप्या भाषेत समजावून दिला.
सावानाच्या २००१ मध्ये झालेल्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षपदही भूषविण्याचा मान कुलकर्णी यांना मिळाला होता. स्थानिक वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख, लेखमाला प्रकाशित झाल्या. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य राम कुलकर्णी तसेच वैद्य विजय कुलकर्णी यांचे ते वडिल होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The senior author dr manohar balkrishna kulkarni passes away
First published on: 31-01-2014 at 01:46 IST