अहिल्यानगरः शंभर विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा, तसेच त्यासाठी एकूण ४८५ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्याचा अध्यादेश राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने आज, शुक्रवारी जारी केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्याचा अध्यादेश आज जारी करण्यात आला.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आवश्यक स्थावर, जंगम मालमत्ता, मनुष्यबळासह तात्पुरत्या स्वरूपात किमान सात वर्षे वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागात करार करावा लागणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

महाविद्यालय व रुग्णालयाच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्री समितीची मान्यता आवश्यक आहे. परंतु महसूल विभागाच्या संमतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागास नि:शुल्क जागा हस्तांतरित करण्यासही अध्यादेशाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय आवश्यक पदनिर्मिती, पदे भरण्यास व त्याच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेली उच्चस्तरीय समितीची समितीच्या मान्यतेची अट शिथिल करण्यात आली आहे.

सुरुवात जिल्हा रुग्णालयात होणार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाचा वापर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे बांधकाम होईपर्यंत सुरुवातीच्या काळात हे महाविद्यालय जिल्हा सरकारी रुग्णालयात सुरू होणार असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागातील सूत्रानुसार यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागात करार होण्याची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांत सुरुवातीच्या काळात जिल्हा रुग्णालयातच शासकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले होते, याचा दाखला दिला जात आहे. मात्र, पदभरती प्रक्रिया वेगाने झाल्यास यंदाही महाविद्यालय सुरू होऊ शकते, याकडे लक्ष वेधले जात आहे.

बांधकाम, पदांना मान्यता

महाविद्यालय सुरू करण्यास जिल्हा सरकारी रुग्णालयात आवश्यक बदल व दुरुस्ती करण्यासाठी ५ कोटी रु., एमबीबीएसच्या प्रथम दोन वर्षाकरता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी २० कोटी रु., महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामासाठी २१६ कोटी ७५ लाख, महाविद्यालयातल्या पदांसाठी ३४ कोटी ७० लाख, रुग्णालयातील पदांसाठी ४२ कोटी २९ लाख अशा एकूण ४८५ कोटी ८ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

खासदार लंके यांच्याकडून शहराजवळील जागांचे प्रस्ताव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अहिल्यानगर शहर किंवा लगतच्या भागातच सुरू करावे अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली असून, प्रशासन शहराजवळ जागा उपलब्ध नसल्याचे सांगत असल्याचा आक्षेप घेत त्यांनी शहराजवळ अरणगाव, वडगाव गुप्ता, केडगाव कांदा बाजारजवळ, वाळुंज पारगाव, विळद, इंद्रायणी हॉटेलजवळ, निंबळक, चास, पिंपळगाव माळवी व देहरे येथील जागांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.