अहिल्यानगर: अवसायनात निघालेल्या नगर अर्बन बहुराज्यीय सहकारी बँकेमध्ये ठेवी अडकलेल्या, पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेव पावतीच्या ५० टक्के रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात आजपासून वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली. केवायसीची पूर्तता केलेल्या १९२६ ठेवीदारांना सुमारे ११० कोटी रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बँकेत अडकलेल्या पाच लाखांपेक्षा कमी रकमेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे यापूर्वीच परत मिळाले आहेत. मात्र, ज्यांच्या केवायसीची पूर्तता झाली नाही, त्यांना अद्याप पैसे वर्ग करण्यात आलेले नाहीत. बँक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी अवसायनात काढण्यात आली. तत्पूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘अर्बन’च्या संचालक मंडळाचे अधिकार गोठवले होते; तसेच व्यवहारावरही मर्यादा आणली होती. अवसायक म्हणून गणेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. बँकेतील ठेवीदारांची रक्कम परत मिळावी यासाठी अर्बन बँक बचाव कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला.
ठेवी विमा संरक्षण महामंडळाला बँकेने ३७९ कोटी १२ लाख रुपयांची परतफेड केल्यामुळे ठेवीदारांना रक्कम परत करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ बँकेला मिळाला. पैसे वर्ग करण्यासाठी ठेवीदारांकडून क्लेम फॉर्म, केवायसी अद्ययावत करण्यात आले. अशा १९२६ ठेवीदारांना ठेव पावतीच्या ५० टक्के रक्कम आजपासून शाखानिहाय संबंधित ठेवीदारांनी दिलेल्या बँक खात्यातून जमा करण्यात येत आहेत.
बँकेत पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम अडकलेल्या ठेवीदारांची एकूण रक्कम सुमारे २२० कोटी रुपये आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे सुमारे ११० कोटी रुपये परत मिळणार आहेत. अद्याप बँकेने कर्जापोटी दिलेली सुमारे ९०० कोटी रक्कम वसूल होणे बाकी आहे; तसेच २९१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गुन्हाही बँकेच्या संचालक मंडळ, अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेला आहे.