प्रशांत देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची शिष्टाई अखेर कामी आली. यामुळे लॉकडाउनमध्ये मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अडकलेल्या ४८ वर्ध्यातील तरुणांचा परतीच्या प्रवासाचा मार्ग खुला झाला.

नोकरीनिमित्त वर्धा जिल्ह्यातील २२ तरुणी आणि २६ तरुण इंदूरला गेले होते. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन घोषीत झाल्यानं ही मुलं तिथंच अडकून पडली. या मुलांनी तिथं इंदूरच्या राधास्वामी सत्संग परिवारात आश्रय घेतला. यामधील अभिजित कुत्तरमारे या तरुणाने भूमीपुत्र संघर्ष वाहिनीचे अभिजीत फाळके यांच्याशी संपर्क करीत आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर फाळके यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधत याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

या विनंतीची दखल घेत पवारांनी जिल्हा प्रशासनास या प्रकरणी समन्वय साधण्याची सूचना केली. तसेच पालकमंत्री सुनील केदार आणि जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनाही याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना अखेर आज यश आले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीनंतर ही सर्व मुलं ६ मे रोजी इंदूरवरून वर्ध्याकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. जिल्हा प्रशासनाने मुलांना आणण्यासाठी बसची व्यवस्थाही केली आहे. ४० दिवसांपासून बाहेरगावी अडकलेल्या या मुलांच्या परतीचा प्रवास निश्चित झाल्याने पालकांनी भूमीपुत्र संघटनेचे आभार मानले.