अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून जानेवारी २०२४ पर्यंत या मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा आरोप केला होता. राम मंदिराच्या उद्घाटनावेळी भाजपा सरकारकडून मोठा हल्ला केला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सत्यपाल मलिक यांच्या दाव्याचा संदर्भ घेत ही भीती व्यक्त केली आहे. तर, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही असाच आरोप केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं.

“राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय असं म्हटलं जातंय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल, अशी भीती देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटतेय. इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पण आम्ही अत्यंत सावध आहोत”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “त्यांना कसं संपवायचं, हे…”, नितीन गडकरींविरुद्धच्या कथित कटाबद्दल संजय राऊतांचं विधान

बाबरी अयोध्येचा मुद्दा संपलाय

“बाबरी अयोध्येचा मुद्दा संपलेला आहे. हा मुद्दा काढणारा मुर्ख आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा संपवला म्हणूनच तिथे राम मंदिर होतंय. त्याचं श्रेय कोणी घेऊ नये. त्याचं श्रेय घ्यायचं असेल जे हजारो करसेवक मारले गेले त्यांना द्यावं लागेल, त्यात शिवसेनेचा सहभाग आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

“सत्यपाल मलिक म्हणाले की पुलवामा झाला नाही केला गेला. गोध्राबाबतही असंच म्हटलं जातं. त्यामुळे २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील लोकांना बोलावून एका भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल, अशी भिती आम्हा सर्वांच्या मनात आहे”, असं राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन गडकरींना संपवण्यासाठी यंत्रणा राबवल्या जात आहेत

“नितीन गडकरी हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. ते कार्यक्षम मंत्री आहेत. देशभरात त्यांनी केलेलं कामच सध्या दिसतंय. ते भविष्यामधील या देशाचे नेतृत्व आहेत. जे वाटेत आडवे जातात, त्यांना कसं संपवायचं? यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या जातात, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही त्याचे पीडित आहोत.” मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी हे विधान केलं.