ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. मात्र राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी झालेली आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मंत्रिमंळासमोर जे प्रेझेन्टेशन झालं त्यामध्ये आरोग्य विभागाच्या सचिवांनी प्राकर्षाने सांगितलं की महाराष्ट्र आणि आपल्या देशात दुसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र ही शक्यता आहे. आपण ज्या अटी-शर्थी घातल्या आहेत, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, मास्क घालणं, हात सॅनिटाइज करणं या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत,” असं टोपे म्हणाले. “फ्रान्स, स्पेन सध्या युरोपमधील अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकत आहोत, पाहत आहोत. साहजिकच आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी चर्चा सुरु आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे,” असं मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. “दिवाळीच्या तोंडावर अनेकजण घराबाहेर पडताना, शॉपिंग करताना दिसत आहेत. मात्र हे करतानाही काळजी घेण्याची सूचना मी जनतेला करेन,”, असं टोपे यांनी टीव्ही ९ या वृत्तावाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

राज्यामधील मंदिरे उघडण्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना टोपे यांनी, “मंदिरं बंद रहावी असं आम्हालाही वाटत नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मंदिरं उघडण्यासंदर्भात दिवाळीनंतरच मुख्यमंत्री चर्चा करुन निर्णय घेतील,” अशी माहिती दिली. मागील काही आठवड्यांपासून विरोधी पक्षाने मंदिरं उघडण्यावरुन अनेकदा सरकारवर टीका केल्याचे पहायला मिळालं आहे.

आलेख पुन्हा वाढला

करोना संसर्गाच्या कालावधीत राज्यात एका दिवशी सर्वोच्च सुमारे २३ हजार रुग्ण सापडले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात ही संख्या ३६४५ पर्यंत खाली आली होती. मात्र, त्यात पुन्हा वाढ होऊन ऑक्टोबरच्या शेवटी दररोजच्या रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत गेली आहे.

राज्यात २६ ऑक्टोबरला एकाच दिवशी राज्यात ३६४५ रुग्ण आढळले होते. २७ ऑक्टोबरला ५३६३, २८ ऑक्टोबरला ६७८३ तर २९ ऑक्टोबरला ५९०२ रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. ३० ऑक्टोबरला दिवसभरात ६१९० नवीन रुग्ण आढळले. ३१ ऑक्टोबरला ही संख्या ५५४८ एवढी होती. शेवटच्या आठवडय़ात वाढलेली ही संख्या चिंतेची असल्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वाढ बघता दिवाळी साजरी करतानाही करोनाची साथ संपलेली नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे अशी सूचना डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is slight possibility of 2nd corona wave in maharashtra says health minister rajesh tope scsg
First published on: 02-11-2020 at 17:04 IST