धवल कुलकर्णी
करोना व्हायरसपासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी देशभरामध्ये टाळेबंदी ३ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. टाळेबंदी अर्थात लॉकडाउन असतानाही चोरटे मात्र या बंधनांना जुमानत नाहीत असे दिसते. या चोरांनी चक्क नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यामध्ये वाघांच्या गणनेसाठी बसवण्यात आलेल्या आठ कॅमेरा ट्रॅप वर डल्ला मारला!
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा व बफर क्षेत्रात वाघ व अन्य प्राण्यांच्या प्रगणे करिता कार्यक्रम राबविण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत एकूण ३०१ ठिकाणांची निवड करून प्रत्येक ठिकाणी एक जोडी याप्रमाणे एकूण ६०२ कॅमेरा ट्रॅप ४ एप्रिल पर्यंत बसवण्यात आले आहेत.
पण ८ एप्रिल रोजी यांच्यापैकी गोंदिया प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र नवेगाव बांध व झाशीनगर व तिडका गावा शेजारील जांभळी नियतक्षेत्राच्या राखीव वनांमधून एकूण चार कॅमेरा ट्रॅप चोरीला गेल्याचे समजले. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. तसेच वन विकास प्रकल्प गोंदिया मधील वनपरिक्षेत्र डोंगरगाव मधील मारामजोब गावा जवळील मासुलकसा नियत क्षेत्रातील कक्षांमधून दोन कॅमेरा ट्रॅप व वनपरिक्षेत्र जांभळी इथल्या क्षेत्रातील कक्षांमधून अजून दोन कॅमेरा ट्रॅप लांबवले गेले असल्याचे कळविण्यात आले आहेत.
चोरीला गेलेल्या आठ कॅमेरा ट्रॅप ची एकूण किंमत साधारणपणे दीड लाख रुपये आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील अधिकाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅप चोरांची माहिती किंवा कॅमेरा ट्रॅप प्राप्त होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तीस रुपये पाच हजाराचे बक्षीस सुद्धा जाहीर केले आहे.