शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथील ग्रामस्थांनी बुधवारी तिसऱ्या दिवशीही शाळा बंद आंदोलन केले. नियुक्त्या असतानाही शिक्षक हजर होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, शिक्षक हजर होत नाहीत, तोपर्यंत शाळेला कुलूप राहील, असा ठराव विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला. दुसरीकडे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियुक्त्या दिलेल्या शिक्षकांना शाळेवर हजर व्हा अन्यथा निलंबित करू,अशा सूचना केल्या आहेत.
रामपुरी (यादव) येथे दहावीपर्यंत जि. प. ची माध्यमिक शाळा आहे. गतवर्षीपासून ६ वर्गासाठी पाचच शिक्षक कार्यरत आहेत. पकी कदम यांच्याकडे मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे ४ शिक्षक ६ वर्ग शिकवत आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे मार्चचा दहावीचा निकाल घसरला. शाळेचा निकाल केवळ ४३ टक्के लागला. पूर्वी रामपुरीची शाळा गुणवत्तेत आघाडीवर होती. आता शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १२ नोव्हेंबरला जि. प. सीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. तत्कालीन सीईओंनी मानवत प्रशालेतील एस. व्ही. कंठाळे, कोल्हा येथील एस. एस. चिद्रावार, शेळगाव येथील व्ही. बी. आरकडे यांच्या नियुक्त्या रामपुरी येथे केल्या होत्या. अन्य एका शिक्षकाला पंचायत समितीतून तोंडी आदेश देण्यात आले. मात्र, हे चारही शिक्षक अद्यापही रामपुरीला रुजू झाले नाहीत. ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल घेतली नाही. १५ जूनला शाळा सुरूझाल्या. याच दिवशी सरपंच प्रशांत कागदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकले. शिक्षक हजर करा आणि कुलूप उघडा असा निर्धार ग्रामस्थांनी केला. मात्र, तीन दिवसांपासून या आंदोलनाची दखल जिल्हा परिषदेने घेतली नाही. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. पाच प्राथमिक पदवीधर व एक राजपत्रित मुख्याध्यापक अशा एकूण सहा शिक्षकांच्या नियुक्त्या होईपर्यंत शाळेला कुलूप ठेवून आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.