मुंबई : मुख्यमंत्री सचिवालयातील चहापानाच्या खर्चाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकाराच्या आधारे काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे. तो केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठीचा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे. यामध्ये एकाच वर्षातील खर्चाचे देयक असले तरी तो एकाच वर्षात दिलेला नाही. त्यामुळे या खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७७ टक्के वाढ झाल्याचा निष्कर्ष संपूर्णत: चुकीचा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

अलीकडे मंत्रालय आणि मुख्यमंत्री सचिवालयाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देश-विदेशातील शिष्टमंडळे, विविध उद्योगसमुहांचे प्रतिनिधी मंडळे, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या भेटींचा समावेश होतो. यापूर्वी मुख्यमंत्रीकडे आयोजित विभागवार बैठकांची देयके संबंधित विभागाकडून देण्यात येत होते. मात्र आता या बैठकांची देयके मुख्यमंत्री सचिवालयाकडून दिली जात आहेत. तसेच शासकीय विभागांच्या बैठकांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना देण्यात येणाऱ्या चहा-नाश्त्याच्या पदार्थांच्या दरांतही वाढ झाल्याचे सरकारने म्हटले आहे.

बऱ्याचदा या सर्व पदार्थांचा पुरवठा केल्यावर त्यांची देयके तत्काळ सादर केली जात नाहीत. उशिरा सादर झालेली देयके पुढील आर्थिक वर्षात येतात आणि ती देयके एकत्रितपणे अदा केल्यामुळेदेखील अशा खर्चात वाढ दिसते, असे खर्चाच्या आकड्याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात २०१५-१०१६, २०१६-२०१७ आणि २०१७-२०१८ मध्ये चहा आणि अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून झाल्याचा दावा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकारात काढलेल्या माहितीनुसार केला आहे.  या माहितीनुसार २०१५-२०१६ साली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात चहा आणि अल्पोपहारावर ५७ लाख ९९ हजार १५६ रुपये खर्च झाला होता. तर, २०१६-२०१७ मध्ये हा आकडा १ कोटी २० लाख ९२ हजार ९७२ रुपयांवर पोहचला. त्यानंतर २०१७-२०१८ या वर्षात चहा आणि अल्पोपहारावर ३ कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रुपये खर्च झाला. म्हणजे गेल्या तीन वर्षात प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. याचाच अर्थ असा की एका दिवसात फडणवीस सरकार १८ हजार ५०० कप चहा पितात असा होतो.