राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडला इथेच विजय- राजू शेट्टी

राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडला हाच माझा पहिला विजय आहे. ऊसदराबाबत मुख्यमंत्र्यांच्या दारात दहा दिवस शेतकरी बसले होते तेव्हा साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे काय करीत होते? असा सवाल आता खेडोपाडय़ातील शेतकरी विचारणार आहेत.

राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडला हाच माझा पहिला विजय आहे. ऊसदराबाबत मुख्यमंत्र्यांच्या दारात दहा दिवस शेतकरी बसले होते तेव्हा साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे काय करीत होते? असा सवाल आता खेडोपाडय़ातील शेतकरी विचारणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात विखारी प्रचार झाल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
शुक्रवारी इचलकरंजीत त्यांनी शहर विकास आघाडीच्या पदाधिका-यांची बठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. इचलकरंजी शहरासाठी वेळोवेळी विकासकामात मी नेहमीच पुढाकार घेतल्याचे सांगून शहरातील काविळीसाठी मोफत तपासणीसह मेगा क्लस्टर योजना मंजूर करण्यासाठी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शहरातील कामगारांच्या आंदोलनावेळी यंत्रमागधारक व कामगारांत समझोता व्हावा यासाठी प्रयत्नशील होतो. साखर महासंघाचे अध्यक्ष असतानाही आवाडे यांनी ऊसदर आंदोलनात तोंडही उघडले नाही. शहरातील डेक्कनसह अनेक विषय आपण उघडकीस आणणार असल्याचेही शेट्टी यांनी या वेळी सांगितले. मतदारसंघात जे पूर्वी विरोधक होते तेच आताही आहेत. त्यामुळे आमच्या मतांमध्ये कोणतीही वजाबाकी झालेली नाही. उलट महायुतीमुळे आणखी पाठबळ मिळणार आहे. जातीयवादी म्हणून माझ्यावर आरोप केला जातो. मात्र जैन समाजातील उमेदवारी देऊन खरे जातीयवादी कोण हे काँग्रेस-राष्ट्रवादीनेच दाखवून दिले आहे. देशातही आत्ता सत्ताबदल होणार असून नरेंद्र मोदी यांच्या विकासाची नांदी ही मतदारसंघात राहणार आहे. शहरातील काळम्मावाडी पाणी योजना, आरटीओ कार्यालय, आयजीएमचे हस्तांतरण आदी विषयांसह विकासकामांसाठी मी नेहमीच पुढाकार घेईन अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बैठकीवेळी आमदार सुरेश हाळवणकर, शविआचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव, माजी नगराध्यक्षा मेघा चाळके आदींनी शेट्टींच्या विजयासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. बठकीस शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजू आलासे, आरपीआयचे श्रीनिवास कांबळे, दीपक भोसले, नगरसेवक तानाजी पोवार, महादेव गौड, हिंदुराव शेळके, आक्काताई कोटगी, संतोष शेळके, विलास रानडे, बादशाह बागवान, नागेश पुजारी, गोवर्धन दबडे आदी उपस्थित होते. आभार नगरसेविका ध्रुवती दळवाई यांनी मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: This is success when ncp left constituency raju shetty

ताज्या बातम्या